Wednesday 13 September 2017

आश्‍वासने न पाळल्याने सत्तेतून बाहेर : खा. शेट्टी

राज्यात आणि देशात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी संघटनांची मोठी मदत झाली असून निवडणुकीपूर्वी त्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. यामध्ये मोदींना शेतीविषयीचे अज्ञान असावे किंवा त्यांनी आम्हाला फसवून सत्ता मिळविण्याचा डाव साधला असावा, अशी आमची आता खात्री पडली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असून यापुढे तीव्र आंदोलने करून सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मंगळवारी खा. राजू शेट्टी सोलापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र तुपकर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भालवडकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, विद्यार्थी संघटनेचे अमोल हिप्परगे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी शेतकरी संघटनेने काही अटी व शर्ती घातल्या होत्या. यामध्ये उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव कृषी मालाला मिळावा तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आणि शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या मान्य करण्याच्या अटीवर शेतकरी संघटना राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी झाली होती. मात्र यापैकी कोणतेच आश्‍वासन शासनाने पाळले नाही. त्यामुळे शेतकरी संघटना सत्तेतून बाहेर पडली असल्याची जाहीर कबुली शेट्टी यांनी दिली. शेतीविषयीची पुरेपूर माहिती मोदी सरकारला नाही. त्यामुळे ते असंवेदनशीलपणाने वागत असून याचे विपरित परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला. 
राज्य शासनाने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा कांगावा सुरू केला असला तरी अद्यापही शासनाकडे बिनचूक माहिती उपलब्ध नाही तसेच निकष आणि अटी घालून अनेक शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा घाट शासनाने घातला आहे. दुसरीकडे अशिक्षित शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबवून त्यांची कुचेष्टा केली आहे. दुसरीकडे ई-सेवा केंद्रांमध्ये शेतकर्‍यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये खरिपासाठी खूपच कमी कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन रब्बी हंगामात तरी हा कर्जवाटपाचा टक्का वाढवावा, असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...