Sunday 3 September 2017

फिर्यादीला चांगली वागणूक द्या

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात फिर्यादिला योग्य वागणूक देणे आवश्यक आहे. मात्र त्याचा विसर पोलिसांना पडला आहे. पुणे जिल्ह्यात आता फिर्यादिला चांगली वागणूक देण्यासाठीचे धोरण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ठरविले आहे. तसे न करणाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 फिर्याद नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकाला चांगली वागणूक दिल्यास पारितोषिक व वाईट वागणूक दिल्यास निलंबन या प्रयोगाची अंमलबजावणी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी सुरु केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी बारामतीत बोलताना ही माहिती दिली. पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादी आल्यानंतर त्याच्याशी सौजन्याने बोलणे, त्याची फिर्याद लिहून घेणे, एफआयआरची प्रत त्याला विनामूल्य देणे या बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादीचे जे हक्क निश्‍चित केले आहेत, त्याची अंमलबजावणी होण्याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी याबाबत पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यांची पाहणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना डमी फिर्यादी बनवून पाठविण्यात आले. या फिर्यादिंना आलेल्या अनुभवाच्या आधारे संबंधित पोलिस ठाण्यातील अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. चांगली वागणूक देणाऱ्यांना बक्षिसे देण्यात आल्याचे हक यांनी सांगितले.

कंट्रोल रूम' कडून घेणार माहिती

यापुढे आता संबंधित पोलिस ठाण्यातील प्रत्येक फिर्यादिला आता "कंट्रोल रूम' मधून फोन केला जाईल. पोलिस ठाण्यात वागणूक कशी मिळाली? फिर्याद नोंदवून घेताना त्रास झाला का? पैशाची मागणी कोणी केली का? फिर्यादिची प्रत मिळाली का, या प्रश्‍नांच्या आधारे फिर्यादीकडे माहिती घेतली जाईल. यानुसार संबंधित पोलिस अंमलदाराचे "रॅंकिंग' केले जाईल. योग्य असलेल्यांना बक्षिसे, अयोग्य असलेल्यांना शिक्षा असे धोरण असेल. त्यामुळे याचा योग्य परिणाम साधला जाईल, असा विश्‍वास हक यांनी व्यक्त केला.

महिलांच्या गुन्ह्यांबाबत संवेदनशीलतेने काम कसे करावे, याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यासठी एका कंपनीने सहयोग देऊ केला आहे. यानुसार जिल्ह्यातील पोलिसांचे बॅचनुसार प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...