Saturday 9 September 2017

सदाभाऊंचे आव्हान शेट्टी स्वीकारणार काय?




खासदारकीचा मागितला राजीनामा - मंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचा दावा
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात संघर्ष सुरू असेपर्यंत मंत्री खोत यांनी तोंड उघडण्याचे टाळले. मात्र, त्यांना संघटनेतून काढून टाकल्यानंतर मात्र त्यांनी खासदार शेट्टी यांच्याविरुद्ध तोंड उघडण्यास सुरवात केली आहे. शेट्टींना निवडून द्या म्हणून यापूर्वी मंत्री खोत यांनी अनेकांवर तोफा डागल्या. आता हेच खोत शेट्टींना आव्हान देऊ लागले आहेत. श्री. खोत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे म्हणणारे खासदार शेट्टी यांना तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, मी मंत्रिपदाचा देतो’ असे खुले आव्हान दिले आहे. हे आव्हान खासदार शेट्टी स्वीकारणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उसाचे असो किंवा दुधाचे आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनात खासदार शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच लक्ष्य केले.
त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या जवळ जाऊ शकत नव्हते. गेल्या निवडणुकीत खासदार शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांच्यासोबत मंत्री खोत देखील होते. दिल्लीत आणि राज्यातही भाजपची सत्ता आली. त्यामुळे शेट्टी यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होऊ लागली; पण एक सदस्य असलेल्या स्वाभिमानीची डाळ दिल्लीत शिजली नाही. मात्र, राज्यात सदाभाऊंचा नंबर लागला. तेव्हापासून खासदार शेट्टी यांनी त्यांच्याविरुद्ध रान उठविण्यास सुरवात केली.
मंत्री खोत यांना संघटनेतून बाहेर काढल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार शेट्टी यांना मंत्रिपदासाठी दुसऱ्या कार्यकर्त्याचे नाव देण्याची विनंती केली. याकडे शेट्टी यांनी दुर्लक्ष केले. मंत्री खोत यांना भाजपकडून अभय मिळाल्यानंतर शेट्टी यांनी सरकारमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या नावाने खडे फोडत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर ज्या ठिकाणी भाजपसोबत सत्तेत आहे, त्या ठिकाणी देखील खासदार शेट्टी तसाच निर्णय घेण्याचे धाडस दाखवतील असे वाटत होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या दबावापुढे त्यांना झुकावे लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तांमध्ये तडजोडीची भूमिका घेताना दिसत असतानाच मंत्री खोत यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे.
काळच सांगेल...
शेट्टी यांनी खोत यांना मंत्रिमंडळातून काढावे म्हणून जंग जंग पछाडले. जाहीर सभांमधून त्यांनी मंत्री खोत यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ते वारंवार करत होते आणि आजही करत आहेत. यावर मंत्री खोत यांनी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, अगोदर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान दिले आहे. ज्या दिवशी खासदारकीचा राजीनामा द्याल, त्या दिवशी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे सांगितले. त्यामुळे दुसऱ्यांना नेहमी सत्तेला गोचडीसारखे चिकटले आहेत, असे म्हणणारे खासदार शेट्टी या आव्हानाला कितपत प्रतिसाद देतात, ते येणारा काळच सांगेल

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...