Monday 4 December 2017

लग्नाचा वाढदिवस साजरा केला अंधशाळेत

पंढरपूर : लग्नाचा वाढदिवस म्हटले की पत्नीला खुष करण्यासाठी महागडे गिफ्ट, केक, थंड हवेचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फिरायला जाणे, महागड्या हॉटेलमध्ये जेवण, सेलिब्रेशन आदी प्रकार सर्वपरिचित आहेत. मात्र पाश्चात्य परंपरेला फाटा देत पटवर्धन कुरोलीत नंदकुमार व कांचन या नवदांम्पत्यांनी पंढरपूर येथील अंध व अपंग विद्यालयात अंधांना अन्नदान करत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यामुळे अंधही काही काळ भारावून गेले.
पटवर्धन कुरोली येथील नंदकुमार नाईकनवरे व कांचन यांचा विवाह ४ डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. त्याच्या अगोदर काही दिवस पंढरपूर (वाखरी) चा वीर सुपूत्र मेजर कुणाल गोसावी अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला होता. त्यावेळीही नंदकुमार याने लग्न घटीका मुहूर्ताला फाटा देत भर लग्नात शहीदाला श्रद्धांजली वाहून आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न केले होते. त्याचीही जिल्हाभर चर्चा झाली होती. स्वत: हॉटेल व्यवसाय करणाºया व त्यातून मिळणाºया मोजक्या रक्कमेतून नंदकुमार याने आत्तापर्यंत अंध, अपंग, वृद्ध यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. गावातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, गरजू मुलींच्या पालकांना लग्नासाठी मदत करणे आदी स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.
याच उपक्रमाची पुढे वाटचाल करीत असताना आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने लायन्स क्लब संचलित अंध व अपंग विद्यालयातील अंधांना अन्नदान करून व शाळेला देणगी देऊन साजरा केला. हे अंध विद्यालय गेल्या २७ वर्षापासून पंढरपुरात कार्यरत आहे. पहिली ते आठवीपर्यंत शिकणाºया या अंध विद्यार्थ्यांना हस्तकला, व्यवसाय, संगीत, संगणक प्रशिक्षण देऊन घडविले जात आहे. ३० विद्यार्थ्यांसाठी शासन अनुदान देत असले तरी या विद्यालयात शिकणाºया अतिरिक्त २० विद्यार्थ्यांना देणगीतून मोफत भोजन व शिक्षण दिले जाते. याच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा व स्पर्धा परीक्षेत मोठे यश प्राप्त करत स्पर्धा
परीक्षांमध्ये अव्वल येत पाच विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. भविष्यातही अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या परीने जमेल तेवढी मदत करणार असल्याचे नंदकुमार नाईकनवरे यांनी सांगितले. नंदकुमारने केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने अंधशाळेतील अंध विद्यार्थी, पालकही काहीकाळ भारावून गेले होते.
यावेळी मुख्याध्यापिका रोहिणी घोडके, संतोष बाराहाते, महेश म्हेत्रे, नितीन कटप, सुनील व्यवहारे, मोहन डावरेगणेश जाधव, नवनाथ नाईकनवरे, रघुनाथ नाईकनवरे, मोहन कोळी, पांडुरंग नाईकनवरे, गणेश गिड्डे, शशिकांत गिड्डे आदी उपस्थित होते.
नंदकुमारच्या मदतीमुळे अनेकांना उभारी
स्वत: हॉटेल व्यावसायिक असलेल्या नंदकुमार याने आजपर्यंत वृद्ध, अपंग, मतीमंद, शालेय विद्यार्थ्यांना मदतीचे धोरण अवलंबले आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीने अनेकांचे शिक्षण, संसार, वृद्धांना उभारी मिळाल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना लग्नाच्या कार्यक्रमात शहीद मेजर कुणाल गोसावी यांना वाहिलेली श्रद्धांजली व लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी आपल्या पत्नीसोबत अंधशाळेत अंधांना अन्नदान करून दिलेली देणगी याची चर्चा तालुकाभर आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...