Monday 6 August 2018

रत्नाईच्या कृषिदूतांकडून जनावरांचे मोफत लसीकरण......


 


 पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या साथरोगांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने रत्नाई कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जनावरांचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते.
      या वेळी कृषिदूतांकडून जनावरांचे विविध आजार व त्यासाठी देण्यात येणाऱ्या वेगवेगळया लसींबद्दल माहिती देण्यात आली. जनावरे आजारी पडल्यानंतरची लक्षणे व आजार होऊ नये यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना यासंबंधी चर्चा करण्यात आली.
      पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता असते.गावात लाळ खुरकत रोगाची जनावरांना लागण होण्याचा अनुभव नेहमी येतो. फऱ्या व घटसर्पबाधित जनावरेही आढळतात. त्यामुळे या तीन मुख्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठीची लस देण्यात आली.
       या लसीकरणाव्यतिरिक्त जनावरांना पाण्यातून जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लहान-मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांना जंतनाशक औषधांचे डोस देण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सरपंच दादासाहेब साखरे यांनी भूषविले.पशुचिकित्सक डॉ.समाधान लामकाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदूत ओंकार गायकवाड,राकेश शिंदे,सुदर्शन सुतार,सागर पवार,सुरज गुंड, तेजस मोहिते, साहिल कोठारी, महेश सुर्यवंशी,सृजन पुट्टा आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...