Monday 9 December 2019

कन्हेर धरण (जि.सातारा) येथून १९७८ साली पिराची कुरोली  (ता.पंढरपूर) येथे विस्थापीत झालेले चिंचणी छोटेसे गाव स्वतः चे जीवन अंधकारमय करून इतरांच्या जीवनांमध्ये प्रकाश तयार करणार्या या गावाने फिनीक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत स्वच्छता अभियान, सुंदर मंदिर, पाच हजार झाडे जगवुन पर्यावरण पुरक गाव म्हणुन  महाराष्ट्रात नावलोकिक मिळविला आहे.   गावची लोकसंख्या जेमतेम साडेतीनशे.  लोकसंख्या जरी कमी असली तरी लोकसहभागातुन सर्व काही शक्य असल्याचे गावाने दाखवून दिले आहे. दहा वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा हाणी होत असल्याने दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे येथील ग्रामस्थाना जाणवले. त्यावेळी त्यानी गावात झाडे लावण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थानी गावात अतिशय नियोजन पद्धतीने तीन हजारावर झाडे लावली. गावात रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमीत,  शाळेच्या आवारात, मंदिर परिसरात तसेच गावातील मोकळ्या जागेत हे वृक्षारोपण केले. यावेळी त्यानी फुलाच्या झाडासह नारळ, चिंच, पेरु, चिक्कू, आवळा, अंजीर, जांभुळ, सीताफळ यांच्यासह ऒषधी गुणधर्म असणार्या तुळस, अडुळसा या सारख्या वनस्पतीसह उत्पादन देणार्या फळांच्या झाडांची हि लागवड करण्यात आली. ग्रामस्थानी लोकसंख्येच्या दहापट झाडे लावली. पण दुष्काळात आव्हान होते ते झाडे जगविण्याचे.  यावेळी ग्रामस्थानी प्रत्येक रोपाला पाणी कसे मिळेल अशी व्यवस्था केली हि झाडे जोपासण्यासाठी ग्रामस्थानी लोकवर्गणीतुन विंधन विहीर घेतली. आणि प्रत्येक झाडाला ठिबक केले. आणि त्यानंतरच्या दुष्काळातहि झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. झाडांना अळी बनविणे, गवत कापणे हि कामे ग्रामस्थ श्रमदानातुन करतात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हि
 झाडे हिरवाइने फुलून जातात.गावात शेळया,जनावरे आहेत परंतु सर्व झाडे विना ट्री गार्ड ची झाडे आहेत. महाबळेश्वरच्या परिसरातून विस्थापित झालेल्या चिंचणी ने गावातच प्रति महाबळेश्वर उभे केले आहे.आज चिंचणी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाच हजार झाडे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातहि या ठिकाणी संपूर्ण गाव हिरवेगार दिसते. तसेच झाडामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांची किलबिलाट चालू आहे. ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी झाडावर पाण्यासाठि भांडी ठेवतात.  तसेच पक्षांना आंघोळीकरीता झाडांच्या खाली पाणी भरून ठेवण्यात येतात. झाडे मोठ्या प्रमाणात  असल्यामुळे पक्षांची संख्या भरपुर आहे हे पक्षी गावातुन बाहेर जाऊ नये म्हणुन गावात दिवाळी,यात्रा,लग्न,मध्ये फटाके वाजवले जात नाहीत. सोलापूर जिल्हा हा कायम स्वरूपी कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.पाऊस भरपूर पाडण्यासाठी पर्यावरण संतुलित राहणे गरजेचे आहे.   त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याची गरज असून चिंचणी सारख्या छोट्या गावाने जो आदर्श घालून दिला आहे. तो सर्वानी आत्मसात केल्यास पर्यावरण संतुलित राहिल. आणि दुष्काळी सोलापूरच्या बाबतीत वेगळे चित्र पाहावयास मिळेल हे नक्की. गावातील निसर्ग संपन्नता,  पक्षाचा किलबिलाट,  फुलपाखरे,  स्वच्छता,  स्वच्छ हवा या सर्व वातावरणाचा विचार करता गावाने सामुदायिक पणे गावातच पर्यावरण पुरक गाव निर्माण केले आहे. झाडे मोठ्या प्रमाणात  असल्यामुळे पक्षांची संख्या भरपुर आहे हे पक्षी गावातुन बाहेर जाऊ नये म्हणुन गावात दिवाळी,यात्रा,लग्न,मध्ये फटाके वाजवले जात नाहीत.  गावात फटाकेबंदी आहे. शाळेतील मुले दरवर्षी फटाके न वाजवण्याची शप गावाने उद्योग व कृषीपर्यटन केंद्र उभे करण्याचे काम सुरू केले आहे. गावालगतच गावातील शेतकऱ्यांची शंभर एकर जमीन आहे. शेती जैविक व सेंद्रिय करुन यामधून गावामध्ये येणाऱ्या पर्यटकांना गावातच राहणे, ग्रामीण जीवणशैली ग्रामीण खाद्यपदार्थ, ग्रामीण खेळ, चालीरिती याची ओळख व्हावी. सर्वात महत्त्वाचे गावातील स्त्री, पुरूषांना गावातच रोजगार मिळावा त्यांचे स्थलांतर थांबावे,  गावाचा विकास दर वाढावा या उद्देशाने लोकसहभाग व लोकवर्गणी हा प्रकल्प हाती घेतला आहे.

गावाच्या या वाटचालीत एकीचे बळ महत्त्वाचे आहे. गावामध्ये महिला व पुरूषांचे लाखो रूपये भांडवल असणारे आठ बचत गट आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून दुध संकलन व शितकरण केंद्र सुरू असून ते लाखो रूपये नफ्यात आहे. शुध्द पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प  आहे. तसेच रोटरी क्लब पंढरपूर यांचे सहकार्यातून संपूर्ण गावाचे रेन वाॅटर हार्वेस्टींग करून घराजवळ शो़षखड्ड्यात पाणी जिरवले आहे.
चिंचणी गावाची कृषीपर्यटनाकडे वाटचाल करण्याचा ग्रामस्थांची संकल्पना असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अशा गावाना शासनाने कृषी पर्यटन करण्यासाठी या गावाना पाठबळ देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...